
रूपारेलमध्ये असताना...
रूपारेलमध्ये असतानाची गोष्ट
ती मला खूप खूप आवडायची
हसताना गालावर तिच्या
अगदी गोड खळी पडायची
नुसत्या स्पर्शानेदेखील जसं
मिटून जातं लाजाळुचं पान
तशीच तिच्या येण्याची चाहूल
हरपून टाकायची माझं भान
तिचं कॉलेज सकाळचं म्हणून
मीसुद्धा लवकर उठायचो
ती यायची ट्रेनने म्हणून
मीही मग ट्रेननेच जायचो
गणिताचे सर, इंग्लिशच्या मॅडम
सारयासारयात तीच दिसायची
कधी कधी तर वर्गातसुद्धा
चक्क बाजुला येऊन बसायची
लायब्ररीत तर दिवसभर फक्त
ती असायची म्हणूनच जायचो
कधी कधी तर लेक्चर बुडवून
लायब्ररीतच बसून रहायचो
कॅन्टीनमध्ये कधी समोर आली ना
की पोटात खोल खड्डा व्हायचा
डोळे मिटून घेतले तरीही
तिचाच चेहरा समोर यायचा
जातो आताही अधूनमधून
रूपारेलच्या फाटकासमोरून
ती नसते अन नसते तिची चाहून
असतं फक्त भर दुपारचं उदास ऊन..
No comments:
Post a Comment